मागील चार वर्षांतील कामगिरीच्या जोरावर काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनी मुंबई महापालिकेतील सर्वांत कार्यक्षम नगरसेवक बनून पहिला क्रमांक पटकावला आहे.
Akash Sonawane : Mumbai Uncensored, 21 January 2022
प्रजा फाऊंडेशनने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेत संयुक्त प्रगती पुस्तक प्रसिद्ध केले. सदर अहवालानुसार पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा पहिल्या क्रमांकावर, शिवसेनेचे समाधान सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे हरीश छेडा यांची निवड झाली.
‘प्रजा’ च्या प्रगती पुस्तकात २०१७ ते २०२१ पर्यंत नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. या प्रगती पुस्तकात ‘प्रजा’ ने विविध निकषांची गोळाबेरीज केली असता महापालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी केवळ १०% म्हणजेच फक्त २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरीत नगरसेवक क, ड, ई आणि फ श्रेणीत समाविष्ठ झाले आहेत. या संपूर्ण प्रगती पुस्तकात एकंदरीत प्रथम श्रेणी मिळवलेल्या नगरसेवक रवि राजा यांची काही वैशिष्ठे जाणून घेऊ :
“लोकप्रतिनिधी”
कोविड काळात मुंबई महापालिकेने विकेंद्रित पद्धतीने काम करण्यासाठी वॉर्ड स्तरीय ‘कोविड वॉर रुम’ सुरु केले, ज्यामध्ये काही नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जसे, स्थानिक पातळीवर प्रभावीपणे काम करणे, नागरिकांपर्यंत पोहोचणे, कार्यक्षमतेने त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे इत्यादी ‘रवि राजा’ यांनी एक लोक प्रतिनिधी म्हणून यशस्वीपणे पार पाडले.
“विरोधी पक्ष नेता”
कोविड मुळे सुरू झालेल्या टाळेबंदीच्या काळात जे मदतकार्य झाले त्यात सर्वच नगरसेवक सक्रिय झाले होते. तातडीची मदत लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या नगरसेवकांनी समन्वयाने काम केले. मात्र असेच समन्वयातून केलेले काम दीर्घ काळ करत राहणे जरुरीचे होते आणि रवी राजा हे त्याचे अचूक उदाहरण बनले. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कशाप्रकारे नियमित बैठका कराव्या तसेच एक विरोधी पक्ष नेता म्हणून शासनाला उत्तरदायित्व सिद्ध करण्यास कसे भाग पाडावे तरच हे शक्य होऊ शकेल हे सुद्धा त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले.
“कौशल्यपूर्ण नगरसेवक”
लॉकडाऊन सुरु असताना काही काळ नियमित बैठका व चर्चा पूर्णपणे थांबल्या होत्या, काही दिवसांनंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन स्वरुपात पुन्हा सुरु झाल्या. महामारी असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन कामकाजाची गुणवत्ता आणि बैठकांची संख्या दोन्हीही वाढवणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन काळाच्या गरजेनुसार कार्यपद्धतीत बदल घडवून आणण्याचे कौशल्य सुद्धा ‘रवि राजा’ यांनी दाखवले.
एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या काळात महिन्याला सरासरी २४ वॉर्ड बैठका घेण्यात आल्या. तर ऑक्टोबर-डिसेंबर २०२० या दरम्यान जेव्हा वॉड स्तरीय बैठका ऑनलाईन स्वरुपात झाल्या तेव्हा ही संख्या महिन्याला सरासरी २८ अशी होती. तसेच एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या काळात वॉर्ड समित्यांच्या २१ बैठका, वैधानिक समितीच्या ३२ बैठका, सर्वसाधारण सभेच्या ७ बैठका दरमहा झाल्या. तंत्रज्ञानाचा वापर करुनही बैठक संख्या व चर्चेची गुणवत्ता वाढत होती आणि अधिक समावेशक पद्धतीने निर्णयप्रक्रिया सुरु होती. रवि राजा यांनी या सर्व बैठकांमध्ये वक्तशीरतेने उपस्थिती तसेच एक जबाबदार नगरसेवक म्हणून प्रश्न उपस्थित करुन त्याचा पाठपुरावा देखील केला.
“गुणवत्ता यादी”
१. संपूर्ण प्रगती पुस्तका आधारे – ८१.१२% – ‘अ’ श्रेणी – पहिला क्रमांक
२. प्रश्न मांडणी – १८५ प्रश्न – अ’ श्रेणी – तिसरा क्रमांक
३. प्रश्नांची गुणवत्ता – ६७.०४% – सहावा क्रमांक
४. समस्यांशी निगडित प्रश्न – ‘अ’ श्रेणी
५. निधी चा वापर – ८५% – ‘अ’ श्रेणी
६. बैठकींमध्ये उपस्थिती – ‘ब’ श्रेणी
७. गुन्हेगारी नोंद – ०० – ‘अ’ श्रेणी
संबंधित यादीच्या आधारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वश्रेष्ठ नगरसेवक झाल्याबद्दल ‘रवि कोंडू राजा’ यांचे हार्दिक अभिनंदन.