Culture

‘चिमाजी आप्पा – एक अविस्मरणीय योद्धा’ : महेश नेने यांच्या कल्पनेतून चित्रपटाकडे…

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncennsored, 31th March 2022

महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडले गेलेले शूरवीर आणि त्यांच्या शौर्य गाथा ह्या कायमच अलिप्त राहिल्या किंवा केल्या गेल्या. परंतु त्यांच्या  आठवणी आणि बलिदान हे गडकिल्ले आणि वास्तूंच्या रुपात अजरामर आहेत. सध्याच्या काळात त्याही नेस्तनाभूत होताना आपण पाहत आहोत. गडकिल्ले आणि दुर्गांच्या अवस्था आपणास ठाऊक आहेतच. परंतु चित्रपट निर्माते महेश नेने आणि त्यांच्यासारखे अनेक इतिहासप्रेमी हे आपल्या वास्तूंचे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या इतिहासाचे संवर्धन आपल्या परीने कायमच करत असतात. 

हिंदवी स्वराज्याचे आणि मराठा साम्राज्याचे मानले जाणारे दुसरे शिलेदार म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवे आणि पेशवाई काळातील त्यांचे योगदान हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा एक महत्वाचा इतिहास मानला जातो. पोर्तुगीज आणि निझामशाही च्या विरोधात उत्तरेकडील मोहीम तसेच कोकण मोहीमेसाठी स्वराज्यात आपले अमूल्य योगदान निर्माण केलेले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा आपल्या कोकण मोहिमेतील वसई किल्ल्याच्या लढ्यामुळे कायम स्मृतीस राहतात. 

निर्माते महेश नेने हे वसई किल्ला येथे भेट देण्यास गेले असता, तेथील किल्याची दुरावस्था पाहता महाराष्ट्राच्या इतिहासासाठी त्यांच्या भावना जागृत होऊन त्यांनी चिमाजी आप्पा यांच्या योगदानाची आठवण करुन देणारा एक चित्रपट करण्याचे ठरवले आणि सुरुवात झाली ‘चिमाजी आप्पा – एक अविस्मरणीय योद्धा’ चित्रपटाच्या रुपेरी पडद्याकडील प्रवासाची.. 

मुंबई अनसेंसर्ड कडे चिमाजी आप्पा या चित्रपटाबद्दल मनोगत व्यक्त करताना निर्माते महेश नेने सांगतात.. 

“मला गड किल्ल्यांची आणि इतिहासाची आवड असल्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळायची आणि मिळते तेव्हा तेव्हा मी वेगवेगळ्या किल्ल्यांवर जातो आणि त्या किल्ल्यांच्या इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न करतो. असेच मनात आले आणि मी वसईच्या किल्ल्यावर जाण्याचा बेत आखला आणि मी वसईच्या किल्ल्याचा रस्ता धरला”

“का कोणास ठाऊक, पण किल्ला फिरताना त्या किल्ल्याच्या तुटलेल्या भिंती आणि मोडकळीस आलेले बुरुज बघुन मन विषण्ण झाले आणि हळू हळू त्या किल्ल्याचा इतिहास डोळ्यासमोरुन सरकू लागला मन इतिहासाकडे केव्हा वळले कळलेच नाही. आणि धर्म लढ्याचे चलचित्र डोळ्यासमोर सुरु झाले.”

“आत्ताची किल्ल्याची झालेली दुरावस्था, तिकडे येणारे लोक, त्यांची ती मजा मस्ती अश्लिल चाळे बघुन शरीराची लाही लाही झाली. कारण असे की, त्या किल्ल्याचा इतिहास लोकांना माहीत नाही. त्या किल्ल्याचे महत्व ते जाणत नव्हते कारण आपल्या इतिहासात काही  गोष्टींना महत्वच दिले गेले नाही. हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांना किती हाल सोसावे लागले याची कल्पना नाही. किती मराठे मारले गेले, कित्येक कुटुंब उधवस्त झाली, किती रक्ताचे पाट वाहिले ह्याची कल्पना त्या लोकांना नव्हती आणि नेमके त्याच वेळी हा इतिहास लोकांसमोर आणायचे मी ठरवले.”

“परंतु तो आणायचा कसा? हा प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर उभा राहिला. लोकांसमोर कुठलीही गोष्ट जर सोप्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आणली तर लोकांवर त्याचा नक्कीच प्रभाव पडतो हे माझ्या लक्षात आले. कारण असे अनेक ऐतिहासिक चित्रपट आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आणि मी ठरवले की चिमाजी आप्पा हे अविस्मरणीय योद्धा आणि त्यांचे पोर्तुगिजांबरोबरचे धर्मयुद्ध यावर सिनेमा काढुन हे युद्ध का झाले, त्या वेळी होणारे हिंदू धर्मावरील अत्याचाराचे चित्रण आणि त्या जुलमी सत्तेला आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्य असलेल्या पोर्तुगाल सैन्याला चिमाजी आप्पांनी कसे हद्दपार केले हे या चित्रपटाच्या रुपाने लोकांसमोर मांडण्याचे ठरवले. निदान यावरुन तरी सद्य परिस्थितीत बदल घडून येईल. लोकांना आपल्या गडकिल्यांचे महत्व कळेल आणि राज्यसरकार आणि केंद्रसरकार सुध्दा त्या वास्तूच्या डागडूजीकडे लक्ष देऊन किल्ल्याचे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलतील अशी आशा आपण करुया.”

अशाप्रकारे भावुक होऊन चित्रपट निर्माते होण्याच्या त्यांच्या प्रवासाचे आणि चिमाजी आप्पा या चित्रपटाच्या पार्श्वभूमीचे वर्णन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version