Kalyani Gilbile, 12th July 2022:
गंभीर आर्थिक संकटाच्या जाळ्यात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. गगनाला भिडलेली महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा यामुळे लाखों संख्येने लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहे. एवढेच, नव्हेतर शनिवारी असंख्य आक्रमक नागरिकांनी राष्ट्रध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानांच्या घरात घुसून ताबा मिळवला आणि पंतप्रधानाच्या शासकीय निवासस्थाला आग लावली.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यानी देश सोडून पलायन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणांकडून अद्याप असा कोणताही खुलासा झालेला नाही आहे. राष्ट्रपती गोटाबाय यांनी अजूनतरी औपचारिकपणे राजीनामा दिला नसून ते अज्ञातवासात आहे, असे म्हटले जात आहे.
श्रीलंकेची अशी बिकट परिस्थिती पहिल्यांदाच झाली असून या देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे तळागाळाला गेली आहे. श्रीलंकेतील सरकार जनतेच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकली नाही, असे दिसून येते. श्रीलंकेची अर्थव्यवस्थाही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु करोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन जवळजवळ ठप्प होते. तसेच, गेल्या वर्षी राजपक्षे सरकारने पूर्णपणे जैविक शेती करण्याचे जाहीर करून कोणतीही पूर्वतयारी न करता सर्वप्रकारचा शेतीमाल आयात करण्यावर बंदी घातली. त्यामुळे देशातील कृषी उत्पादनांवर वाईट परिणाम झाला आणि अपुऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामुळे प्रचंड महागाई वाढून साठेबाजीला सुरुवात झाली. आणि साठेबाजीला नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहिर करून जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला.