Uncensored Marathi

माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांच्या पाठपुराव्याला यश; आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर शासनाची कारवाई

Published

on

माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये माजी मुद्रांक जिल्हाधिकारी तथा म्हाडाच्या सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल व वन विभागाने वंदना सूर्यवंशी यांची प्रतिनियुक्ती समाप्त करून त्यांना महसूल विभागात दि. १३ जुलै २०२६ रोजी तात्काळ रुजू होण्याचे आदेश जारी केले आहेत.

विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांमध्ये कथित महसूल नुकसान, सुरू असलेली विभागीय चौकशी तसेच शासनाच्या आदेशांच्या अंमलबजावणीचा विषय समाविष्ट होता. शासनाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत महसूल विभागात रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे पालन न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत नलावडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय पारदर्शकता व उत्तरदायित्व अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version