Uncensored मराठी

…म्हणून फडणवीस म्हणाले, “शिवसेनेचे हिंदुत्व फक्त भाषणापुरतेच राहिले आहे”

Published

on

फडणवीसांचा संदर्भ देत, मालवणी मधील टिपू सुलतान क्रीडा संकुल च्या निषेधार्थ मुंबई भाजप, शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याची मंगल प्रभात लोढा यांची खोचक टीका..

Akash Sonawane : Mumbai Uncensored, 25th January 2022 :

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील मालाड मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करुन सत्ताधारी काँग्रेसकडून वर्चस्व गाजवले जात असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मार्फत हे सर्व काम झाल्याचे फलकावरुन निदर्शनास आले आहे. दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त याचे लोकार्पण करण्यात येणार असून आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत हा सर्व प्रकार घडत असला, तरी आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याचा आव आणणाऱ्या शिवसेनेने मात्र यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे.

मालवणी परिसरात टिपू सुलतानच्या या नामकरणामुळे स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक सामाजिक स्तरांमधून या प्रकाराचा तीव्र निषेध केला जात आहे. क्रीडा संकुलाच्या उभारणीला आमचा विरोध नसून टिपूच्या नावाला आक्षेप आहे, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

“मुंबईसह राज्यभरात काही विशिष्ट समाज घटकांचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना त्या भागातून हद्दपार करण्याचे डाव आखले जात आहेत. हिंदू समाजाला छळण्याचे, त्यांच्या मालमत्तांना नुकसान पोहोचविण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने काही समाजघटक करत आहेत. मात्र, अशाप्रकारे मुंबई-महाराष्ट्रातील हिंदूंसह इतर कुठल्याही घटकाला अशाप्रकारे हद्दपार करण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आम्ही कदापि पूर्ण होऊ देणार नाहीत.” – आ. मंगल प्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई, भाजप

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणांना टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीवरुन राजकारण रंगताना दिसून येत होतं. शिवसेनेच्या ‘एम-पूर्व’ प्रभाग क्र. १३६ मधील नगरसेविकेने काही महिन्यांपूर्वी गोवंडीमधील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, तेव्हा या मागणीवर भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. हिंदूंचा क्रूर पद्धतीने छळ केलेल्या हिंदूद्वेशी टिपू सुलतानचे नाव वॉर्ड क्र. १३६ च्या उद्यानाला द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जनाबसेनेची ही मागणी अत्यंत चमत्कारिक आहे, अशी टीका मुंबई भाजपतर्फे करण्यात आली होती. 

काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात आता उघडपणे टिपूचा उल्लेख वीर टिपू सुलतान असा करत त्याचे नाव क्रीडा संकुलाला देण्याचे प्रयत्न काँग्रेसतर्फे करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्नाटकात शिवरायांचा अपमान आणि महाराष्ट्रात टिपूचा सन्मान अशी दुहेरी भूमिका काँग्रेसकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. कारण डिसेंबर २०२१ मध्ये कर्नाटकाची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा घृणास्पद प्रकार करण्यात आला होता. या सर्व प्रकारात स्थानिक काँग्रेस नेत्यांचा अप्रत्यक्ष, तर काही काँग्रेस कार्यकत्यांचा थेट सहभाग असल्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

सदरील संकुलाच्या कामाला एक वर्षांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या मैदानात टेनिस, क्रिकेट खेळण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. मात्र, महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हे मैदान कांदळवनाच्या जागेवर भराव टाकून अनधिकृतरित्या उभारण्यात आले आहे. या सर्व प्रकाराला स्थानिक लोकप्रतिनिधींसह काही वरिष्ठ नेत्यांचाही आशीर्वाद आहे, अशी भूमिका काही स्थानिक नागरिकांनी नाव न घेण्याच्या अटीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version