Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 26th February 2022
नवाब मलिकांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजप नेत्यांच्या सुरु आलेल्या वक्तव्यांवरुन अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाजप नेत्यांच्या या वक्तव्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार नेमकं कधीपर्यंत टिकेल, हेही त्यांनी पुण्यातील विकासकामांच्या आढाव्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
मालिकांची अटक आणि त्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकारणाबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं होणाऱ्या आरोपांबाबत बोलताना नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, “आरोप-प्रत्यारोपातून महाराष्ट्र पुढं जाणार नाही. ज्याला कुणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. आमचं काम भलं आणि आम्ही भलं.”
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आल्यापासून गेली सव्वा दोन वर्षे तारखा दिल्या जात आहेत. पण काहीही झालेलं नाही. त्यामुळं त्यावर किती वेळा बोलायचं,” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
“जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे, जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,’ असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
मालिकांवरील आरोपांवर मत व्यक्त करताना अजित पवार यांनी स्पष्ट केले कि, “नवाब मलिक यांनी केलेला जमिनीचा व्यवहार १९९३ चा आहे. आता २०२२ सुरु आहे. ते आता न्यायालयाच्या माध्यमातून बाजू मांडत आहेत. त्यावर अधिक बोलणं योग्य नाही. पण भाजपचा कोणीतरी नेता पहाटे साडेतीन वाजता ट्वीट करतो, मग साडेपाच वाजता केंद्रीय यंत्रणांची लोकं एखाद्याच्या घरी जातात, असं सगळं सुरू आहे. हे सर्वांनाच दिसतंय. सरकारं येत असतात, जात असतात. द्वेषभावनेतून वागायचं की कसं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. कालही काही लोकांवर धाडी पडल्या. फक्त एक पक्ष सोडून बाकी सर्व पक्षाच्या लोकांवर धाडी पडत आहेत. यातून काय बोध घ्यायचा तो जनतेनं घ्यावा.”