Politics

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदुत्वासाठी आक्रमक पवित्रा, महाविकास आघाडी सरकार विरोधात रोखठोक भूमिका…

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 5th April 2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थ येथे पार पडला. सोबतच सलग दोन वर्षे मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभा नाहीत, भाषणं नाहीत, आक्रमक भूमिका सुद्धा नाहीत, मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकां संदर्भातही फारश्या प्रतिक्रिया नाहीत परंतु पाडव्याच्या निमित्ताने “२ वर्षांची तुंबलेली मोरी आपण आज जमेल तेवढी काढू” असे आपल्या मुंबईकर चाहत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या अनोख्या शैलीची आठवण करुन देत सुरुवात केली. 


कित्येक वर्ष महापालिकेत सत्ता असूनही मातोश्रीच्या समोरंच बेहराम पाडे वाढतच चालले आहेत..!

“आज ज्या प्रकारचा बकालपणा महाराष्ट्रामध्ये खासकरुन मुंबईमध्ये आणलेला आहे.. मी कॉलेजला जात होतो, तेव्हा बांदऱ्यावरुन हार्बरने जात असे. कोर्टाच्या बाजूने जाताना उजवीकडे सात आठ दहा झोपड्या होत्या. त्याला बेहराम पाडा म्हणायचे. आज जाऊन बघा, चार चार मजल्यांचा बेहरामपाडा झालाय.. कुठे आहे तो बेहराम पाडा ? मातोश्रीमधनं बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस करायचा.. बेहराम पाडा..! ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष महानगरपालिका आहे. काहीही घडलं नाही, काहीही झालं नाही, बेहरामपाडे वाढतायेत. जी परिस्थिती मुंब्राची आहे.”

“माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे. या ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना तुम्ही, या आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे. ह्या  झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या मदरशांवर एकदा धाडी टाका. काय काय गोष्टी हाताला लागतील तुम्हाला कळेल. अहो गरजच नाही आपल्याला पाकिस्थानची, कशाला हवाय पाकिस्थान? उद्या जर काही घडलं तर आत मध्ये आवरता आवरता आपल्याला ना की नऊ येणार आहेत, इतक्या गोष्टी आत मध्ये भरलेल्या आहेत, आम्हीच त्या झोपडपट्या वाढवतोय आम्हीच मदरशे वाढवतोय, त्यात अनेक मशिदी अशा आहेत की ज्यांच्या आत काय नेमकं चालू आहे समजत नाहीये.”

पाकीस्थान्यांना बांग्लादेशीयांना सर्व पुरवणारे नगरसेवक आमदार खासदार..!

“हि सगळी पाकिस्थानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोकं आहेत. आमच्या नगरसेवकांना, आमदारांना, खासदारांना याच्याशी काही देणंघेणं नाही, आमचे नगरसेवक आमदार खासदार कशात लागले आहेत? पाकिस्तानातून आलायेत? या..! बांगलादेशातून आलायेत? या..! आधार आहे? रेशन कार्ड नसेल? रेशन कार्ड घेऊन जा; आणि आमचीच मारा..! ह्याना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच”


मशिदींवरचे भोंगे उतरवा अन्यथा त्यासमोर हनुमान चालीसा लावू..!

“ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशांत दिसतात का?”


हिंदू हा फक्त हिंदू – मुसलमान दंगलीत हिंदू असतो..!

“मी हिंदुत्त्वावर बोलणार आहे. माझ्या दृष्टीकोनातून हिंदुत्त्वं काय आहे ते मांडणार आहे. अयोध्येला जाणार, आता तारीख नाही सांगत. कुठलं हिंदू आणि हिंदुत्त्वं घेऊन बसलो आहोत आपण. हिंदू हा फक्त हिंदू – मुसलमान दंगलीत हिंदू असतो. तो २६ जानेवारी १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीनने आक्रमण केल्यावर त्याला कळतच नाही की तो कोण आहे. तेव्हा तो बंगाली, पंजाबी, मराठी होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवीये, शरद पवारांना हीच गोष्ट हवीये. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर जातीचं राजकारण वाढलं. दुसऱ्या जातीचा द्वेष वाढला. कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं तर कधी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. महाराष्ट्र जातीत खितपत पडलाय.”


विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला..!

“२०१९ ची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खासकरुन उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षे ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. महाराष्ट्रभर सभांमध्ये बोलला नाहीत.”

“मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एकांतात बोलले होते, मग बाहेर का नाही बोलले? जी गोष्ट सगळ्या लोकांसमोर येणार आहे ती चार भिंतीत का केलीत.”


याशिवाय राज ठाकरेंनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही सडकून टीका केल्या. 

“एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत? तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार?”

“पुस्तकांमध्ये काहीतरी वेडंवाकडं छापून आणायचं आणि त्यावरून जातीपातीचं राजकारण करायचं. कोण जेम्स लेन? जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? ज्याचा या देशाशी संबंध नाही, तिथे इथे येतात आणि आमच्या जिजाऊ – शिवरायांविषयी वेडवाकडं लिहीतात. त्यावर जातीपातीचं राजकारण तापवलं जातं.”


“इतकी वैभवशाली परंपरा असलेला महाराष्ट्र कुठे आणून ठेवला. गृहमंत्री 100 कोटी मागितले म्हणून जेलमध्ये जातो, आणखी एक मंत्री दाऊदशी संबंध आहे म्हणून जेलमध्ये जातो. हे महाराष्ट्रात चालू आहे. जेलमध्ये अडीच वर्षं असणाऱ्याला पहिला मंत्री करण्यात आलं. मुंबईत स्फोट घडवणाऱ्या दाऊद शी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये गेले, यांना फरक पडत नाही.”

“चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना नोटिस आली, अजून गेले नाही. संपत्ती जप्त करायला लागले तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. जनतेनं नादान राजकारणाला बळी पडू नये, एवढीच अपेक्षा आहे.

“‘बेस्ट’ चे प्लॉट बिल्डरांच्या घशात घातले, मुंबईत प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी?”

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मनसेने भाजपच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारी भूमिका मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यापासून ते उत्तर प्रदेशमधील विकासाच्या मुद्द्यापर्यंत अनेक बाबींमध्ये घेतल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. मात्र, भाजप नेते नारायण राणे आणि मोहित कंभोज यांनी मात्र राज ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतीमा लोकांनी काल राज ठाकरे यांच्यात पाहिली” – मोहित कंबोज
 

“मुंबईत रोज आता पाच वेळा लोक हनुमान चालीसा ऐकतील यासाठी मी मनापासून राज ठाकरे यांचे आभार मानतो. ज्यावर अजान होते असे अनधिकृत लाऊडस्पीकर उतरवले पाहिजेत. मुंबई पोलीस आयुक्तांनीही यावर कारवाई केली पाहिजे. ही मागणी गेल्या काही दिवसांपासून भाजपद्वारे करण्यात येत होती. तसेच हा जो विषय राज ठाकरे यांनी उचलला आहे, त्यांना सर्व हिंदूंचे आभार आहेत,”

“आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. अजान ही झालीच पाहिजे. परंतु लाऊडस्पीकरवर जी अजान होते ती बंद झाली पाहिजे ही आमची मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष गेले अनेक वर्ष हिंदुत्वाबद्दल बोलत आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची झलक लोकांनी राज ठाकरे यांच्यात पाहिली. शिवसेनेनं आपलं दुतोंडी राजकारण बंद करुन ते लाऊडस्पीकरवरील अजानच्या बाजूनं आहेत की विरोधात हे त्यांनी सांगितलं पाहिजे, यावर शिवसेनेची काय भूमिका आहे?”


“जर अनधिकृत लाऊडस्पीकर्स असतील तर उतरवले गेले पाहिजे असे न्यायालयाचेही निर्णय आले आहेत.

संजय पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि अनधिकृत लाऊडस्पीकर वरुन जे अजान होतात, ते उतरवून टाकावे,” असं मोहित कंबोज म्हणाले.

“शिवसेनेची हिंदुत्वाशी मोठी गद्दारी” – नारायण राणे

“गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे.”

“पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.”


सदर भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. हे भाषण चर्चेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिनांक ३ एप्रिल ला राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे यांचे हे भाषण भाजप प्रेरित असल्याची टीका एकीकडे विरोधक करत असतानाच नितीन गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप एकत्र येणार का ही चर्चाही सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version