Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 7th April 2022
मनसे गुढी पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या मशिदींवरच्या भोंग्यांविरोधातील आक्रमकतेमुळे सध्या सर्वत्र लाउडस्पीकरवर अजान हा वाद चांगलाच तापला आहे. मशिदींवरचे भोंगे उत्तरावावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल अन्यथा त्यासमोर दुपटीने हनुमान चालीसा लावू. या त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभर महाराष्ट्र सैनिकांनी हनुमान चालीसा लावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निदर्शने सुरु आहेत.
“मी जगातील अनेक ठिकाणी फिरले आहे. आखाती देशांतही गेले आहे. तेथे ध्वनीक्षेपकावर बंदी आहे. इस्लामी देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकायला मिळत नाही. मग केवळ भारतातच ती का ऐकायला मिळते?”, असा प्रश्न जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
‘‘मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण देशात अशाच प्रकारे जर अजान देत राहिले, तर ते करतात मग आपण का नाही? अशा भूमिकेत अन्यही लोक ध्वनीक्षेपकाद्वारे हनुमान चालिसा लावतील. अशामुळे पुढे वाद निर्माण होतात. जे भारतात होतं तसं अन्य देशांमध्ये होत नाही. मी कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. पण भारतात या गोष्टींना मोठ्या प्रमाणात दुजोरा दिला जातो.’’
“हिंदूंनी आपल्या मुलांना देशाच्या संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत’, हे त्यांना कळायला हवे. हिंदूंनी ४ वेद, १८ पुराणे आणि ४ मठ यांविषयी जाणून घेतले पाहिजे.’’
अशाप्रकारे लॉउडस्पिकर वरील अजान वादावर आपल्या भावना व्यक्त करत सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी हिंदू तरुणांना देखील संबोधित केले.
सोबतच सत्ताधाऱ्यांनी याचा विरोध केलाच परंतु भाजपा कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करत राज ठाकरेंना पाठिंबाच दर्शवला आहे. भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.