Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 8th April 2022
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, काळबादेवी येथील काही पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सहमतीसह कारवाईच्या नावाखाली अंगडिया व्यापाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पैसे उकळल्याचा आणि अधिक खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर कथित आरोपींमधील उपनिरीक्षक समाधान जमदाडे हे अटकेत असूनही त्यांना पोलीस महासंचालक कार्यालयातून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करुन पदोन्नती देण्यात आली आहे.
७ डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील भुलेश्वर येथील अंगडीया असोसिएशनचे योगेश गांधी, जतीन शहा, मधुसूदन रावल, मगन प्रजापती यांनी दक्षिण विभाग अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेऊन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अमंलदार यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत लेखी तक्रार दिली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलीप सावंत यांनी पोलीस सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था च्या मार्फत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्याकडे टिपणी सादर केली. यावर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पैसे घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे जबाब नोंदवण्यात आले. प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे व इतर अंमलदार यांनी दिनांक २,३,व ६ डिसेंबर २०२१ रोजी पोफळवाडी परिसरातील अंगडीया व्यापार करणाऱ्यांना आयकर विभागाची भीती दाखवून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच दिनांक २२ मार्च २०२२ रोजी जाहीर केल्या गेलेल्या निवडसुची क्र. पोमसं/४/११/६ (२०२०-२१)/७१/२०२१ मध्ये शासन निर्णय, समान्य प्रशासन विभाग – क्र. एसआरव्ही-२०१८/प्र.क्र.१५९/ कार्यासन १२, सामान्य प्रशासन विभाग – क्र. बीबीसी-२०१८/प्र.क्र.३६६/ १६-ब, महसुली विभाग वाटप नियम-२०२१, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम-२२ न नुसार दिनांक ०९/०२/२०२२ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पात्र ठरलेल्या निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांपैकी ८४६ निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांना निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती करण्यास मान्यता दिली आहे. ज्या मध्ये आरोपी समाधान अरुण जमदाडे यांचे देखील नाव जाहीर केले गेले आहे.