Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 11th April 2022
दिनांक १७ जून १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेलेला शनिवारवाडा महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान तसेच कार्यालय असणारा आणि महाराष्ट्राचा इतिहास वास्तुरूपी जिवंत ठेवणारा हिंदवी स्वराज्याचा अंश शनिवारवाडा हा सध्या फक्त एक पर्यटनस्थळ म्हणून राहिलेला आहे.
शनिवारवाडा मराठा साम्राज्याच्या वैभवाचा, विजयाचा, पराक्रमाचा आणि इतिहासाचा साक्षीदार आहे. पेशव्यांचा शनिवारवाड्या ने जसे सोनेरी दिवस पाहिले तसेच वाईट दिवस ही पाहिले आहेत. शनिवार वाड्याच्या राजेशाही वैभवासाठी आणि हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी अनेक मराठ्यांनी आपले प्राण पणाला लावले. पेशव्यांच्या ब्रिटिश, निझामशाही आणि पोर्तुगीजांविरोधी मोहिमा जगभरात प्रसिद्ध आहेत. हिंदूंच्या संरक्षणासाठी पेशव्यांचे योगदान मोठे मोलाचे आहे. त्यांचे हे वास्तूरुपी अस्तित्व टिकवून ठेवणे आणि त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
शासकीय यंत्रणांनी या वास्तू कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष घालून शनिवारवाड्याची दुरुस्ती करुन त्याचे अस्तित्व मलिन होण्यापासून थांबवावे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी येथील सुरक्षा वाढवावी असे सॅफ्रन थिंक टॅंक चे संस्थापक सिद्धांत मोहिते यांनी त्यांच्या पुणे दौऱ्या दरम्यान सांगितले. येथील भिंतींची दुरावस्था झाली आहे. तरुण जोडपे येथे आपले नावे लिहून जात असल्याने या वास्तूचा अपमान होऊन दिवसेंदिवस शोभा हरवत चालली आहे. या वास्तूचे गांभीर्य येथे येणाऱ्या लोकांमध्ये असणे गरजेचे आहे. हे सर्व थांबवण्यासाठी, दुरुस्तीसाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी योग्य ती उपाय योजना तातडीने राबवण्याची मागणी सॅफ्रन थिंक टॅंक या संघटनेने केली आहे.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून शनिवारवाड्याची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता केली जात नाही व दुसऱ्यांनाही करू दिली जात नाही. पुरातत्व खात्यास जमत नसेल तर स्वच्छता करण्याची परवानगी आम्हाला द्यावी, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनने पुरातत्त्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांच्याकडे केली आहे.
शनिवारवाड्यात जाण्यासाठी २५ रुपये शुल्क आकारले जाते. पण शनिवारवाड्यातील सर्व माहिती फलक पुसट झाले आहेत. कारंज्यात घाण साचली आहे, वाहने लावण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने नागरिकांचे वाद होत असताना सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेतात. शनिवारवाड्यातील लाइट अँड साउंड शो बंद आहे तो पुन्हा सुरु करावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली. शनिवारवाड्यात छोटी कामे केल्यास तेथील स्वच्छता होऊ शकते, पण आम्ही काही करणार नाही आणि कोणाला काही करु देणार नाही, अशी भूमिका आपल्या खात्याची आहे. आमच्या संस्थेला स्वच्छतेसाठी परवानगी द्यावी आम्ही शनिवारवाड्याचे पावित्र्य राखू अशी मागणी खर्डेकर यांनी पुरातत्त्व खात्याकडे केली आहे. असे ‘सकाळ’ या वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.