Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 13th April 2022
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मद्य विक्री केंद्रे आणि आस्थापने यांना देवांची अथवा महापुरुषांची नावे आपण पाहत असतो. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पंकज यादव यांनी २१ जानेवारी २०२० रोजी ठरावाची सूचना मांडत मुंबईतील दारुची दुकाने, बार यांना देवी-देवता, महापुरूषांची नावे ठेवण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली होती. अखेरीस राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून बंदी घातली आहे.
बृहन्मुंबईतील उपहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्य विक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या नावांमध्ये देवदेवतांच्या नावांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते. वास्तविकता पाहिल्यास प्रत्येक धर्मात देवदेवता पूजनीय असतात आणि त्यांच्याप्रती प्रत्येक धर्मियांमध्ये श्रध्देची भावना असते, त्यामुळे मद्यालये, इत्यादी आस्थापनांना देवदेवतांची नावे देण्यात येत असल्याने विविध धर्मियांच्या भावना दुखावतात. दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये दुकाने व विविध आस्थापना यांना महापुरुष किंवा गड किल्ल्यांची नावे न देण्याबाबत तरतूद आहे. मात्र, देवदेवतांची नावे न देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही.
सद्यस्थितीत, महानगरपालिकेला दुकाने/आस्थापना ह्यांना नामफलकाच्या संदर्भातच कारवाई करण्याचे अधिकार आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की उपाहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्यविक्री करणारी दुकाने अशा तत्सम आस्थापनांना देवदेवतांची नावे देण्यास प्रतिबंध करता येईल अशा रितीने दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.