Crime News

आदिवासी कुटुंबातील १३ वर्षीय बेपत्ता जान्हवी दुर्लक्षित, पोलीस अधिकारी वेगळ्याच सुनावणीत..?

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 22 April 2022

मुंबई मध्ये लहान मुले हरवल्याच्या घटना नेहमीच घडत असतात परंतु त्याचा किती गंभीरतेने विचार किंवा पाठपुरावा केला जातो, किती मुले परत सापडतात किती आरोपी पकडले जातात याचा काही नेम नाही. अशीच एक मास्तरवाडी, मढ परिसरातील आदीवासी कुटुंबातील १३ वर्षीय जान्हवी शाळेत जाताना हरवल्याची घटना मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. 

हो, हे तेच मालवणी पोलीस स्टेशन जिथे काही दिवसांपूर्वी श्री रामनवमीच्या दिवशी मशिदीबाहेरुन यात्रा काढल्याप्रकरणी तब्बल २० ते २५ हिंदू तरुणांवर सरकारी फिर्यादीमार्फत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि यांच्या जामिनासाठी २१ तारखेच्या सुनावणीला मालवणी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अगदी दुपारपर्यंत उपस्थित होते. परंतु आता जान्हवी च्या प्रकरणी याच अधिकाऱ्यांचे हात आखडले गेले आहेत. आणि या प्रकरणात जनतेचे हेच सेवक भेदभाव करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मास्तरवाडी, मढ येथे राहणारी अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील १३ वर्षीय जान्हवी सनमित्र विद्या मंडळ या शाळेत इयत्ता ७ वीत शिकत होती. दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी नेहमी प्रमाणे सकाळी ११.३० च्या सुमारास जान्हवी शाळेत जाण्यास निघाली होती. दररोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरी येणारी जान्हवी न आल्याने नातेवाईकांनी शाळेत संपर्क केला असता ती त्या दिवशी शाळेत आलीच नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर तिच्या मैत्रिणींना तसेच आसपासच्या परिसरात विचारपूस केली तरीही जान्हवी चा काही ठाम पत्ता लागला नाही. काळजी पोटी जान्हवीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व कोणीतरी पळवून नेल्याच्या संशयाने अज्ञात इसमा विरोधात तिला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली.

मालवणी परिसरातील मास्तरवाडी,मढ येथील स्थित आदिवासी कुटुंबास न्याय मिळेल का? आणि त्यांना त्यांची हरवलेली जान्हवी परत मिळेल का ? असा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version