Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored 23th April 2022
१७ एप्रिल २०२२ रोजी आरे कॉलनी, गोरेगाव येथे रात्री ८ च्या सुमारास गौतम नगर शिवमंदिरातून कलश यात्रेची मिरवणूक जात असताना त्यामध्ये सहभागी असलेल्या हिंदू भाविकांवर जमावाने हल्ला केला. सदर घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मंदिराजवळ प्रचंड जमाव जमलेला आणि गटांचे सदस्य एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदू भाविकांवर हिंसाचाराच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला, तत्पूर्वी पोलिसांनी २५ जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गौतम नगरमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अन्य आरोपींचा गोरेगाव पोलीस शोध घेत आहेत.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, “याप्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक गैरसमजातून’ ही घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले आणि आता परिस्थिती शांत आहे. काहींना किरकोळ जखमा झाल्या. आम्ही गुन्हे दाखल केले आहेत.”
दरम्यान महाराष्ट्रात आणि देशभरात दिवसेंदिवस अशा अनेक घटना समोर येत असून राज्यांतील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आक्षेप घेत आहेत. जातीयवादी राजकारण सुरु असल्याचेही माध्यमांद्वारे सांगितले जात आहे. परंतु राजकीय विवादांमध्ये गुन्हेगारी वाढत असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.