Uncensored मराठी

शिवलिंग सापडलेली जागा तात्काळ सील करण्याचे वाराणसी कोर्टाचे आदेश; वजु करण्यावरही बंदी

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 16th May 2022

काशी विश्वनाथ येथील ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. कोर्टानं नेमलेल्या ऍडव्होकेट कमिशनर यांच्यामार्फत शनिवारी दिनांक १४ मे पासून हे सर्वेक्षण सुरू केलं होतं.

पाच महिलांनी एकत्र येत ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या दिशेला असलेल्या शृंगार गौरीची दररोज पूजाअर्चा करता यावी अशी मागणी होती. त्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली होती. तसंच त्यांनी प्लॉट नंबर ९१३० चं सर्वेक्षण आणि व्हीडिओ ग्राफीची मागणी केली होती. त्यांची ही मागणी मंजूर करत कोर्टानं सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीचे आदेश दिले होते.

दरम्यान, सर्वेक्षणात उपस्थित असलेल्या काही वकिलांनी सर्वेक्षण संपल्यानंतर मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा मीडियाशी बोलताना केला आहे.

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणा दरम्यान मोठ्या आकाराचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या बाजूने केला जात आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आदेश दिले की, ज्या ठिकाणी शिवलिंग प्राप्त झाले आहे ती जागा तातडीने सील करावी आणि कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.

न्यायालयाने अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी ही निश्चित केली आहे. वाराणसी कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंट हे सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण संपले असले तरीही, शिवलिंग सापडल्याच्या दाव्यांवरुन आता वादळ उठले आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर पडताच हिंदू पक्षांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा सुरू केला. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या आवारातील विहिरीत १२.८ फूट व्यासाचे शिवलिंग सापडले आहे.

मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळून लावला. शिवलिंगाच्या दाव्यावर मुस्लिम पक्षाने खंडन केले आहे. मुस्लिम बाजूचा दावा आहे की, आत काहीही सापडले नाही. दरम्यान, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत शिवलिंग प्रकरणावर मौन पाळले आहे.

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग मिळण्यानंतर कोर्टाने तो परिसर सील केला आहे. तसेच, कोर्टाच्या आदेशानुसार, या परिसरात वजु करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version