Uncensored मराठी

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात, महाराष्ट्रात १४ जिल्ह्यांमध्ये जोरदार निदर्शने

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 11th June 2022

गेल्या महिन्यात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि भाजप पक्षाचे नेते नवीन जिंदाल यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली. पोलिसांच्या माहितीनुसार, काल शुक्रवारच्या नमाजानंतर ठाणे, सोलापूर, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, परभणी, बीड, लातूर, भंडारा, पुणे, नागपूर, सातारा, रायगड आणि चंद्रपूरसह या १४ जिल्ह्यांतील ११७ ठिकाणी निदर्शने करण्यात आली.

तसेच, पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबई, नागपूर, नंदुरबार, अहमदनगर, जालना आणि सातारा शहरात पोलिसांनी आंदोलकांवर सहा एफआयआर नोंदवले आहेत. अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत सरंगल म्हणाले, “महाराष्ट्रात १४ ठिकाणी निदर्शने करण्यात आली… प्रामुख्याने सोलापूर, जालना आणि औरंगाबादमध्ये. तथापि, कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.” 

गेल्या महिन्यात एका टीव्ही शोच्या चर्चेदरम्यान, तत्कालीन भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली होती. यूएई, कतार आणि बहरीनसह अनेक अरब देशांनी त्या टिप्पण्यांवर तीव्र चिंता व्यक्त केल्यानंतर, भाजपने रविवारी नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आणि भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल, ज्यांनी ट्विटरवर पैगबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती, त्यांना 5 जून रोजी पक्षातून काढून टाकण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version