Uncensored मराठी

बोरिवलीतील कोरा केंद्र उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी सज्ज

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 13th June 2022

बोरिवलीतील कोरा केंद्रातील उड्डाणपुलाचे बांधकाम तब्बल 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पूर्ण झाले आहे. नवीन उड्डाणपुलामुळे, प्रवाशांना आता बोरिवली (पश्चिम) मधील सर्वात वर्दळीच्या भागात पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक चांगली मिळेल. मात्र, बांधकामाला झालेल्या दिरंगाईमुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च १२१ कोटींवरून १७३ कोटींवर गेला आहे.

२०१८ मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कोरा केंद्र येथे, लिंक रोड ते SV रोड पर्यंत सुमारे ९३७ मीटर लांबी आणि १५.३ मीटर रुंदी असलेला उड्डाणपूल बांधण्याची योजना आखली. हा उड्डाणपूल कोरा केंद्र मैदानाजवळील भागातून जातो आणि दोन व्यस्त जंक्शन – कल्पना चावला चौक आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक इथून बायपास करत – तो लिंक रोडला जोडतो. FM करिअप्पा उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर वाहनचालकांना कोरा केंद्र उड्डाणपुलामार्गे लिंक रोडला थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. उड्डाणपुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाले होते, परंतु कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान ते थांबविण्यात आले.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वरून लिंक रोडकडे जाणारे वाहनधारक FM करिअप्पा फ्लायओव्हर घेतात, जो SV रोडवर संपतो. मात्र सहसा त्यांना दोन जंक्शनवर ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतो. “लिंक रोडपर्यंत पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात, नवीन उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी चांगली होईल,” असे BMC पुलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून तो लवकरच वाहनधारकांसाठी खुला करण्यात येईल”, अशी माहिती पालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. दरम्यान, BMC ने आणखी ८६० मीटर जोडून उड्डाणपूल WEH पर्यंत वाढवण्याचे काम सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version