Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 24th June 2022
वसई विरार व नालासोपारा येथील गावगुंड आणि विकासक यांची गुंडगिरी आपल्या नेहमीच कानावर येत असते. येथील बिल्डर लॉबी हि कायम गरम असते असे म्हणायला हरकत नाही. अनधिकृत बांधकामे, जमिनींचे व्यवहार, चाळी – इमारतींचे पुनर्वसन हे इकडचे नेहमीचेच विषय.
पाटील नगर, गोराई नाका, नालासोपारा पूर्व येथील रहिवासी रवींद्र यादव याने देखील अशाच बिल्डर च्या स्कीम ला बळी पडून तब्बल ७ लाख रुपये गमावून बसला आहे, शिवाय बेघर होण्याच्या भीतीने मानसिक व शारीरिक त्रासाने ग्रस्त आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये रवींद्रने स्थानिक बिल्डर विनय शुक्ला याच्या कडून सर्वे नं. ७८, गाळा नं. १ आणि २, मंगलमुर्ती चाळ, पाटील नगर, गोराई नाका, नालासोपारा (पुर्व) येथे सुमारे १५ लाख रुपयांना २ गाळे विकत घेतले होते ज्यातील रुपये ६,२५,०००/- आगाऊ रक्कम म्हणून देऊ केले शिवाय सुमारे १,२५,००० रुपये जागेच्या दुरुस्ती खर्च केले व उर्वरित रक्कम ३ महिन्यात देण्याचे सांगितले. सदर व्यवहारात कोणत्याही प्रकारचा करार झाला नाही.
“पूर्ण पैसे दिल्यानंतर करार बनवून देईन.” असे बिल्डर विनय शुक्ला ने तक्रारदार रवींद्र यादव यास आश्वासन दिले. काही कारणास्तव ठरलेल्या वेळेत रवींद्र पैसे देऊ शकला नाही म्हणून त्याने बिल्डरकडे ६ महिन्यांची मुदत वाढवून मागितली, तत्पूर्वी सदर गाळे न कळत त्याने दुसऱ्या व्यक्तीला विकत दिल्याचे रवींद्र ने पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात सांगितले आहे. अशाप्रकारे तब्बल ७ ते ७.५ लाखांचा गंडा घालून बिल्डर विनय शुक्ला याने केवळ १,४८,०००/- परत करून जागा खाली करण्यास सांगितले. यावर रवींद्रने नकार दिला असता त्याला गाळा खाली न केल्यास सर्व सामान बाहेर फेकुन मारून टाकण्याची धमकी दिली.
पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात सदर व्यक्ती हा असे सर्वांसोबत करत असल्याचे सांगितले, वेगवेगळ्या जागा दाखवून पैसे उकळणे, एकाच वेळी एकाहून अधिक व्यक्तींना जागा विकणे असे ह्या बिल्डरचे नेहमीचे कृत्य असल्याचे सांगितले. या बिल्डरला पोलिस व प्रशासनाचे भय नसून कोणी त्याचे काही करू शकत नाही असे रवींद्र ला सांगण्यात आले. व गावगुंडांच्या सहाय्याने रवींद्र व त्याच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली.
पश्चिम मुंबईतुन बहुतांश नागरिक हे वसई विरार कडे स्थलांतर करत असतात. त्याचप्रमाणे मुंबई बाहेरुन आलेले लोक सुद्धा येथे राहण्यास पसंती देतात. स्वस्त दरात घरे मिळण्याच्या अनेक स्कीम या भागात सुरूच असतात. अशाच स्कीम आणि ऑफर ला बळी पडून जनसामान्य आपल्या आयुष्यभराची पुंजी पणाला लावतो. आणि पैसा तर जातोच परंतु तो कायम स्वरूपी बेघर सुद्धा होतो. सदर विकासकांना कोणाचे भय नसल्यामुळे यात स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा असल्याचीही शक्यता उद्भवते.