Uncensored मराठी

कुर्ल्यातील चार मजली इमारत कोसळली; १९ जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 29th June 2022

मुंबईतील कुर्ला येथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११:४५ च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेमध्ये १४ जण जखमी, तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आणि आतापर्यंत जखमीपैकी १० जणांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात सुद्धा आले आहे, अशी माहिती पीटीआयने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यामार्फत दिली आहे. 

कुर्ल्यातील नाईक नगर सोसायटीत असलेल्या रहिवासी इमारतीची डी विंग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली असून त्याच सोसायटीतील दुसऱ्या विंगचा पहिला मजला देखील खचला आणि पाहता पाहता इमारत पत्त्याप्रमाणे कोसळली. इमारत कोसळण्याच्या प्रचंड आवाजाने आजूबाजूचे रहिवासी घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलांच्या सात गाड्या, दोन रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दल, पोलीसांसह स्थानिक रहिवाशानी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले. हे बचावकार्य सोमावारी मध्यरात्री पासून ते मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

“इमारत जीर्ण झाली असून, २०१३ पासून प्रथम दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि नंतर इमारत पाडण्याची देखील नोटिस देण्यात आली होती,” असे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले. 

कोसळलेली इमारत ही मोडकळीस आलेल्या चार इमारतींच्या वसाहतीतील होती. त्यांना पाच ते सहा वर्षांपूर्वीच जागा सोडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही, रहिवासी राहतच होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच, मृत्यूमुखी पडलेले, जखमी झालेले अनेक जण हे मुळ रहिवासी नसून भाडेकरू होते. या इमारतीतील एकूण २४ घरापैकी १६ घऱे ही भाडेतत्वावर दिली होती. 

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने सोमवारी रात्री उशिरा कुर्ला येथे जाऊन इमारत कोसळलेल्या जागेचा आढावा घेतला. “महापालिकेने नोटीस बजावून अशा मालमत्ता रिकाम्या करून घ्याव्यात”, असे ते म्हणाले. “जेव्हा बीएमसी नोटीस बजावते तेव्हा इमारती स्वतःच रिकाम्या केल्या पाहिजेत… अन्यथा, अशा घटना घडतात, जे दुर्दैवी आहे… यावर कारवाई करणे आता महत्त्वाचे आहे,” असेही  ठाकरे म्हणाले. चारही इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र तेथे लोक राहत असल्याचे त्यांनी सांगितले. “आमची प्राथमिकता सर्वांना वाचवणे आहे… आम्ही या इमारती रिकाम्या करणे आणि पाडणे याकडे लक्ष देऊ जेणेकरून आसपासच्या लोकांना आणखी त्रास होणार नाही,” असेही आदित्य  ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version