Kalyani Gilbile, Mumbai Uncensored, 20th July 2022:
आजपासून जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आधीच सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त आहे, त्यात जीएसटी परिषदेने दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित पूर्णपणे विघडवले आहे.
सीलबंद दही-दुधाला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत घेण्यात आला होता, त्यानंतर या गोष्टीवर 5 % जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोणत्या गोष्टी महागणार –
तृणधान्ये, डाळींपासून ते दही, लस्सी, पनीर, गूळ, चिरमुरे, खांडसरी साखर अशा ब्रँड नसलेल्या खाद्यपदार्थांवर आता कर प्रणाली अंतर्गत कर ५% आकारला जाईल. याआधी केवळ ब्रँडेड वस्तूंवरच शुल्क आकारले जात होते.
सध्या शाई (प्रिटिंग व चित्रकलेसाठी वापरली जाणारी), चाकू, एलईडी दिवे, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल शार्पनर्स या वस्तूंवरील जीएसटी आता १२ % वरून १८ % झाली आहे. तसेच, सोलर वॉटर हिटरवर आता ५ % वरून १२ % जीएसटी आकारला जाणार आहे.
त्याचवेळी रुग्णालयातील अतिदक्षता नसलेल्या खोल्यांचे एका दिवसांचे भाडे ५००० रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यावर ५ % जीएसटी लागू होणार आहे.
कोणत्या गोष्टी स्वस्त होणार –
ऑस्टोमी प्रकारच्या शस्त्रक्रियेच्या उपकरणांवरील जीएसटी १२ % वरून ५ % करण्यात येणार आहे.
ट्रक/मालवाहतूक भाड्याने जेथे इंधन खर्च समाविष्ट असेल तेथे 18% ऐवजी 12% इतका जीएसटी कमी होईल.
विमानाने इकॉनॉमी क्लासमधून बागडोगरा ते ईशान्येकडील राज्यांच्या हवाई प्रवासावर जीएसटी माफ करण्यात आला आहे. तसेच, बॅटरीसह किंवा त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांवर 5% जीएसटी आकारण्यात येणार आहे.