मुंबईतील मीरा रोड परिसरात एका 11 वर्षीय मुलाला “जय श्री राम” म्हणाला म्हणून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला फक्त मारहाणच केली नाही तर त्याला “अल्लाह हू अकबर”चा नारा देण्यास जबरदस्ती करण्यात आली.
सोमवार, २५ मार्च रोजी रात्री तो अल्पवयीन मुलगा दूध घेऊन त्याच्या सोसायटीमध्ये आला. सोसायटीजवळ येताच तिकडे उभ्या असलेल्या एका माणसाला तो ‘जय श्री राम’ बोलला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या अन्य पाच जणांनी त्याला थांबायला सांगितलं. पण, त्यांना घाबरून हा मुलगा सोसायटीच्या आत पळाला. त्यावेळी हे तरुणसुद्धा त्याचा पाठलाग करत सोसायटीमध्ये शिरले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला लिफ्ट जवळ गाठलं आणि बेदम मारहाण केली.
माराहण केल्यानंतर तरुणांनी त्या मुलाला ‘अल्लाहू अकबर’ चा नारा जबरदस्ती द्यायला लावला. एका रहिवाशाने अल्पवयीन मुलावर हल्ला झाल्याचे पाहिल्यानंतर त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून गेले. त्यांनी ताबडतोब अल्पवयीन मुलाच्या वडिलांना माहिती दिली आणि त्यांनी त्याला मीरा रोड पोलिस ठाण्यात नेले. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 448, 295A, 153A, 37, 1C आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, मात्र अद्याप एकाही तरुणाला अटक करण्यात आलेली नाही.